क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम रिव्ह्यू: 'घटत्या मराठी शाळांची संख्या' यावर एक तीक्ष्ण पण विनोदी भाष्य

रेटिंग: ४/५                               सुयोग झोरे


लेखक-दिग्दर्शक हेमंत यांच्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' सिनेमाची कथा अशा एका शाळेभोवती गुंफलेली आहे, जी लवकरच पाडली जाणार आहे. १९३५ साली बांधल्या गेलेल्या क्रांतीज्योती विद्यालय या शाळेची इमारत धोकादायक आहे असे कारण सांगून आता तिथे एक नवीन इंटरनॅशनल स्कूल बांधले जाणार आहे. ही शाळा पाडण्यामागे काही मोठे राजकारणी, सरकारी अधिकारी, व्यावसायिक या सर्वांचा हात आहे. या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) मात्र या निर्णयाच्या पूर्ण विरोधात आहेत. शेवटी आपली शाळा वाचवण्यासाठी ते याच शाळेचे माजी विद्यार्थी बबन (अमेय वाघ), कुलदीप (सिद्धार्थ चांदेकर), राकेश (हरीश दुधाडे) व विशाल (पुष्कराज चिरपुटकर), तसेच सलमा हसीना अंतुले (क्षिती जोग) अंजली राणे (प्राजक्ता कोळी), आणि सुमन (कादंबरी कदम) या सर्वांची मदत घ्यायची ठरवतात. 

बबन हा इतका प्रामाणिक व्यावसायिक आहे, की त्याच्या प्रामाणिकतेमुळेच त्याला जास्त टेंडर्स पण मिळत नाहीत. कुलदीप ज्याला एकेकाळी लिखाणात आणि पुस्तक वाचण्यात खूप रस असायचा तो आता एक प्रसिद्ध अभिनेता बनलाय, तर राकेश वकील असूनसुद्धा त्याचा शेती करण्यात जास्त रस आहे. सलमा ही एक अनाथ मुलगी आता IPS ऑफिसर आहे, आणि अंजली PHD करून स्पेनमधील जिनिव्हा या शहरात राहतेय. विशाल आणि सुमन हे दुबई मध्ये मोठे रेस्टॉरंट चालवतात. हे सर्व मित्र मैत्रिणी या गावात येऊन आता त्यांची शाळा पडण्यापासून कशी वाचवतील आणि शाळेला वाचवण्यासाठी कोणकोणत्या क्लुप्त्या लढवतील हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.  

सहसा असं म्हटलं जातं की शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नाही, तर आयुष्य घडवणारी संस्कारांची शाळा आहे. आणि नेमकी हीच गोष्ट 'क्रांतीज्योती विद्यालय' हा चित्रपट अगदी सोप्प्या, सर्वांना समजेल अश्या चित्ररूपी भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो, ते ही अगदी आपल्याला हसत-खेळवत ठेवून. या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे प्रेक्षकांना एक महत्वाच्या विषयावर लक्ष वेधवताना, प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंज होईल याची घेतलेली पूर्ण काळजी. यातील संवाद तुम्हाला खूप हसवतात. यात काही मार्मिक विनोद देखील आहेत जे हसवण्यासोबत आपल्याला विचार करण्यास भाग पडतात. या खूप वर्षांनी पुन्हा भेट झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे शाळा वाचवण्याचे प्रयत्न पहायला भेटतात, पण त्याचसोबत ते या पुनर्भेटीत त्यांच्या शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षणांना पुन्हा एकदा अनुभवताना दिसतात. 
हेमंत ढोमे यांच्या पूर्वीच्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील कथानक पुढे नेण्यासाठी परिचित कथात्मक संरचना आणि व्यक्तिरेखांचा वापरही करतो, परंतु तरीही त्याची अंमलबजावणी मजबूत असल्याने, त्या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक ओळख निर्माण झाल्यामुळे आणि पारंपरिक विषयांवर केलेल्या वेगळ्या वळणांमुळे तो चित्रपट अधिक रुचकर होतो आणि आपल्याला शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. 

एखादा चित्रपट, पिक्चर, मुव्ही, किंवा फिल्म (तुमच्या आवडीनिवडी नुसार तुम्हाला जे चांगलं वाटेल ते नाम निवडू शकता) मोठ्या पडद्यावर पहायला आल्यावर-तो तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवेल- ही तुमची अगदी सामान्य अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये हेमंत ढोमे यांचा 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट नक्की यशस्वी झालाय. हा चित्रपट तुम्हाला खूप हसवतो, थोडफार रडवतो, शाळेच्या जुन्या आठवणी जाग्या करून कदाचित भावनिक करतो, आणि त्याचसोबत महाराष्ट्र राज्यामध्येच मराठी माध्यमांच्या शाळांची हालत पाहून विचार करण्यास देखील भाग पाडतो. एका बाजूला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत असताना सध्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या जवळजवळ १८,००० मराठी शाळा, खासकरून ज्यांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहेत त्या शाळा बंद होण्याची टांगती तलवार लटकत आहे. 

मराठी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळत आहेत, ज्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या घटत आहे. झपाट्याने कमी होत चाललेली मराठी शाळांची संख्या, मातृभाषेचं महत्त्व आणि शिक्षणव्यवस्थेतील बदल या गोष्टींवर आपण सर्वांनीच लक्ष देणं का गरजेच आहे यावर क्रांतीज्योती विद्यालय' भाष्य करतो. या चित्रपटात सचिन खेडेकर यांचा एक संवाद आहे- "सोप्या गोष्टी अवघड करणं म्हणजे अभ्यास नाही, तर अवघड गोष्टी सोप्या करणं म्हणजे अभ्यास". आणि हे करण्यातच लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यशस्वी झालेत. 'झपाट्याने कमी होत चाललेली मराठी शाळांची संख्या, आपल्या मराठी मातृभाषेचं महत्त्व' या विषयावर एक मनोरंजन करणारा चित्रपट बनवणं ही खरतर एक अवघड गोष्ट होती, पण ही अवघड वाटणारी गोष्ट लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी प्रेक्षकांचे संपूर्ण मनोरंजन होईल याची संपूर्ण काळजी घेत दाखवली आहे. 

या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी पडद्यावर खूप मजा आणली, मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांना खूप हसवले/आनंद दिला. कॉमेडी सीन्स एखाद्या कलाकाराने पडद्यावर साकरणे हे वाटते तितके सोपे नाही. पण 'क्रांतीज्योती विद्यालय' चित्रपटातील कॉमेडी सीन्स करताना सर्व कलाकारांची एवढी चांगली केमिस्ट्री जमलीय की काही सीन्स पाहताना हे सर्व लहानपणापासून एकाच शाळेत शिकलेले अगदी जवळचे मित्र आहेत असे वाटते. फक्त कॉमेडीच नव्हे तर काही भावनिक सीन्स मध्ये पण सर्वांनी त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. अमेय वाघ त्याच्या आग्री बोलीभाषेतील संवादातून खरच खूप हसू येतं. आणि याच श्रेय नक्कीच उत्कृष्ट संवादासोबत, वाघ याच्या नैसर्गिक अभिनयाला सुद्धा द्यावं लागेल. काही सीन्स मध्ये वाघ याला आपण मुद्दाम काहीप्रमाणात ओव्हर-अक्टिंग करताना पाहतो. पण मला चित्रपट पाहताना तरी असं वाटतं होतं की त्या ओव्हर-अक्टिंग चा वापर मुद्दामहून त्याच्या 'बबन' या पात्राची निरागसता दाखवण्यासाठी केला आहे. 

सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, आणि हरीश दुधाडे यांची केमिस्ट्री पाहून कदाचित तुम्हाला लहानपणी तुमच्या मित्रांसोबत हसत खेळत घालवलेल्या क्षणांची आठवण येईल. प्राजक्ता कोळी जिने हिंदी चित्रपट आणि वेब सीरिज मध्ये अभिनय केला आहे, तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, पण ती देखील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर प्रभाव सोडते. प्राजक्ता अतिशयोक्तीपूर्ण अभिनयावर अवलंबून न राहता तोंडावरील सूक्ष्म पण प्रभावी बदल दाखवते. प्राजक्ताने साकारलेली अंजलीला तिची शाळा वाचवण्यासाठी मदत करत असताना तिच्या भूतकाळात पडलेल्या काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तर सुद्धा सापडतात. ही प्राजक्ताच्या अभिनयातील संयमीता अंजलीच्या मनाला मिळालेली शांतता अधिक प्रभावीपणे उभे राहू देण्यास मोठी भूमिका बजावते. क्षिती जोग, सचिन खेडेकर यांनी सुद्धा त्यांच्या भूमिका उत्तमपणे साकारल्या आहेत. खेडेकर यांनी साकारलेले प्राध्यापक यांचा गोंधळ आणि शंका यांच्यातील बदल सौम्य आणि विश्वासार्ह आहेत. ते मोठ्या भाषणांचा आधार न घेता, आपल्या माजी विद्यार्थ्यांवरील संपूर्ण विश्वास आणि तरीही हळूहळू वाढत जाणारा तणाव प्रभावीपणे मांडतात ज्यामुळे त्यांचे पात्र कथेचा भावनिक आधार बनते.

योग्य प्रकारे वापरल्यास सिनेमा अनेक सामाजिक मुद्द्यांविषयी संदेश पसरवण्यासाठी प्रभावी साधन ठरू शकतो. आणि हेमंत धोमे यांनी 'क्रांतीज्योती विद्यालय' या चित्रपटातून तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट खूप हसवतोच, पण फक्त मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता पालकांमध्ये मराठी माध्यमांच्या शाळेत मुलांना पाठवण्याबाबत वाढणाऱ्या तुच्छभावनेवर संवाद सुरू करण्यास आणि सकारात्मक बदल घडवण्यास प्रवृत्त करतो. हा विचारप्रवर्तक आणि अत्यंत मनोरंजक चित्रपट उत्तम पटकथेची आणि सामाजिक परिणामकारकतेची इतक्या हुशारीने गट्टी जुळवतो, की चित्रपट संपल्यानंतरही तो प्रेक्षकांना दीर्घकाळ विचार करण्यास भाग पाडतो. 

कलाकार: सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, हरीश दुधाडे

पटकथा: हेमंत ढोमे 

दिग्दर्शक: हेमंत ढोमे

Comments

Popular posts from this blog

The Secret Agent review: A meticulously crafted cinematic experience that is virtually flawless

Mayasabha Review: A Masterclass in Atmosphere Trapped in Its Own Shadows

Kohrra season 2 review: Piercing Through the Fog of Patriarchy and Silence